लखनऊ : वृत्तसंस्था – राजधानी लखनऊमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. राजधानी लखनऊचा पॉश एरिया असलेल्या हजरतगंजमध्ये रणजीत बच्चन यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. तर रणजीत यांच्या भावाला सुद्धा दोन गोळ्या लागल्या आहेत.
रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन आपल्या भावासोबत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. हजरतगंज परिसरात सीडीआरआयजवळ बाईकवर आलेल्या मारेकर्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. मारेकर्यांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या मारल्या, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या भावाला सुद्धा गोळ्या लागल्या आहेत. रणजीत यांची हत्या केल्यानंतर मारेकरी फरार झाले. घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
रणजीत बच्चन हजरतगंजच्या ओसीआर बिल्डिंगमधील बी ब्लॉकमध्ये राहत होते. ते मुळचे गोरखपुर येथील राहणारे होते. रंजीत समाजवादी पार्टीचे सांस्कृतिक कार्यक्रम करत असत. प्राथमिक माहितीनुसार रणजीत त्यांच्या भावासोबत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. ग्लोब पार्कमधून बाहेर पडताना बाईकवरून आलेल्या मारेकर्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
गोळ्या लागल्याने त्यांचा भाऊदेखील जखमी झाला आहे. रणजीत यांच्या भावाच्या हाताला गोळी लागली आहे. त्यास जखमी आवस्थेत ट्रामामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तर, समाजवादी पार्टीने या घटनेवरून योगी सरकारवर हल्ला केला आहे. ट्विटरवर लिहिले आहे की, लखनऊमध्ये दिवसाढवळ्या हिंदू महासभा अध्यक्षाची हत्या झाल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात सरकार आणि पोलिसांचा वचक नष्ट झाला आहे.
18 ऑक्टोबरला हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची दोन लोकांनी निर्घृण हत्या केली होती. दोन्ही मारेकरी भगवे कपडे घालून आले होते आणि मिठाईच्या डब्ब्यात त्यांनी पिस्तुल आणि चाकू लपवून आणला होता.
दोघे कमलेश यांच्या घरात पोहचले. पाहिल्या मजल्यावरील पक्ष कार्यालयात त्यांच्या मानेवर त्यांनी गोळी झाडली. नंतर चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले होते. त्यांनतर त्यांचा गळा दाबून त्यांना ठार केले. पोलिसांनी घटनास्थळावरून पॉईण्ट 32 बोअरचे एक पिस्तुल आणि एक खोके जप्त केले होते.