मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काही जण आरोग्यविमा घेताना आधीचे आजार सांगतात, काही आजार लपवत त्यासाठी नंतर विमा घेतात. त्यांनतर काही आजार उद्भवून आरोग्यविमाचा दावा निकाल निघण्यासाठी उशीर होतो. आणि त्यामुळे पॉलिसी असणाऱ्यांना जो त्रास होतो, तो आता कमी होणार आहे. विमा नियामक व विकास प्राधिकरणाने यासंदर्भात आजारांची व्याख्या सुटसुटीत केली असून विम्याचे दावे फेटाळून लावण्याची शक्यता कमी होणार आहे.
विमा नियामक व विकास प्राधिकरणाने सप्टेंबर २०१९ ला काढलेल्या परिपत्रकात पॉलिसीच्या आधी आजारांबाबत दोन शक्यतांवर आधारित व्याख्या दिल्या आहेत. आरोग्यविमा पॉलिसी काढल्यावर पॉलिसीच्या आधी आजारांची लक्षणं दिसून आली तर त्याचे लाभ देण्यासाठी विमा कंपन्यांना लागू करण्यात आले होते. पण विमा नियामक व विकास प्राधिकरणाने व्याख्येतील हा भाग काढून टाकला असून त्याबाबत नवीन परिपत्रक मागच्या आठवडयात सादर केले होते.
हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे विमा क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. ‘पॉलिसीपूर्व किंवा पूर्वी होत असलेले आजार पॉलिसी घेण्यास इच्छुक असलेली व्यक्ती मनोकळेपणाने बऱ्याचदा सांगत नाही. तसेच काहीवेळा या आजारांचे पॉलिसीपूर्व वैद्यकीय चाचणीत स्पष्ट निदान होत नाही. अशावेळी वैद्यकीय चाचणी अहवालानुसार पीईडी नाही, असा शेरा मारत आरोग्यविमा दिला, त्यानंतर एखादा आजार झाला आणि त्यासाठी विम्याचा दावा करताना पीईडीच्या रकान्यात हा आजार पूर्वी एकदा झाला होता असे लिहिले तर त्या पॉलिसीधारकाला विम्याचा लाभ मिळत नाही. याबाबतीत गैरसमज वाढत होते,’ असे विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे माजी सदस्य आणि विमातज्ञ निलेश साठे यांनी सांगितले.
विमा नियामक व विकास प्राधिकरणाने पुढील मुद्दे समाविष्ट केले आहेत. –
पॉलिसीपूर्व किंवा पूर्वीचे आजार (पीईडी) म्हणजे बिघडलेले आरोग्य, दीर्घकाळ असणारा आजार, जखम, व्याधी इ. असा आजार ज्याचे निदान आरोग्यविमा पॉलिसी देण्यापूर्वी ४८ महिन्यांत नोंदणीकृत किंवा अधिकृत डॉक्टकडून झालेले आहे. अशा निदान झालेल्या आजारासाठी नोंदणीकृत किंवा अधिकृत डॉक्टरने पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपूर्वी ४८ महिन्यांत उपचार सुचवले आहेत.