Headmaster Suicide Case | प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतच ढोसली दारू, प्रकरण समोर आल्यावर बदनामीच्या भीतीने स्वतःला संपवलं

December 20, 2024

नांदेड: Headmaster Suicide Case | मुख्याध्यापकाने थेट वर्गातच विद्यार्थ्यांसमोर दारू ढोसली आणि ग्रामस्थांनी हा प्रकार उघड केल्यानंतर बदनामीच्या भीतीने त्याने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहा तालुक्यातील लिंबोटी गावात ही घटना घडली. गोविंद ज्ञानोबा गायकवाड असे मयत शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये (Malakoli Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nanded Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, लिंबोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गायकवाड हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी मुख्याध्यापक शाळेत आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसमोरच दारू ढोसली. हा प्रकार पाहून विद्यार्थी शाळेबाहेर आले. एका ग्रामस्थाने विद्यार्थ्यांना याबद्दल विचारल्या नंतर हा प्रकार उघड झाला.

गट शिक्षणाधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तीन शिक्षकांना चौकशीसाठी शाळेत पाठवले. त्यावेळी मुख्याध्यापक गायकवाड दारूच्या नशेत आढळले. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. एका ग्रामस्थाने मोबाईलमध्ये गायकवाड यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

सायंकाळी गायकवाड आपल्या घरी माळाकोळी येथे परतले. घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. बदनामी होईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.