औरंगाबाद बहुजननामा : जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यपकावर शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागोराव किंडीबा काकळे असे या आरोपी चे नाव आहे. चिंचोली लिंबाजी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. मागील काही दिवसांपासून आरोपी हा शाळेतील मुलींसोबत अश्लील चाळे करत होता, अनेक मुलींनी या संदर्भात आपल्या पालकांना कळविले होते, परंतु मुलींचा गैरसमज झाला असावा, असा विचार करून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु गेल्या १५ दिवसांपासून चौथ्या इयत्तेत शिकणारी मुलगी शाळेत जाण्यास नकार देत होती.
कायम भीतीच्या वातावरणात असल्याचे तिला जाणवत होते, यासंदर्भात तिच्या पालकांनी तिला विचारणा केल्यावर हा भयंकर प्रकार उघडकीस आला. या घटनेचा तपास करत असताना, या प्रकरणात एकच नाही तर अनेक मुली बळी पडल्याची खळबळजनक माहिती समोर आली. बळी पडलेल्या तीन मुलींनी धाडस करून हा प्रकार उघडकीस आणला. बातमी कळताच पालक तसेच नागरिकांनी मुख्याध्यापकास चांगलाच चोप दिला.
शाळेतील हा प्रकार समजताच पोलीस पाटील निलेश बसलाने यांनी आरोपीस एका वर्ग खोलीत बंद केले आणि पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी काकळे यास अटक केली. पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध कलम ३५४, ३५४ अ , POSCO अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.