नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच धक्का पचवून न शकणाऱ्या पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नाशिकमधील सातपुर भागातील श्रमीकनगर वसाहतीत मंगळवारी (दि. 30) पहाटे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रवींद्र तुळशीराम पवार (वय 52, श्रमीकनगर, नाशिक ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र पवार यांच्या पत्नी संगीता पवार (45) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी सोमवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि मुलगी देखील होते. वडिलांना घरी पाठवून भाऊ, बहीण रुग्णालयातच आईजवळ थांबले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे संगीता यांचा मृत्यू झाला. पवार यांच्या मुलाने वडिलांना मोबाईलवर संपर्क करुन ही दुःखद वार्ता कळविली. बराचवेळ होऊनही वडील रुग्णालयात न पोहोचल्याने मुलाने पुन्हा वडिलांना वारंवार फोन केला. मात्र कुठलाही प्रतिसाद न आल्याने मुलाने शेजारच्या कुटुंबियांना फोन करुन वडिलांची माहिती घ्यायला सांगितले. शेजाऱ्यांनी पवार यांच्या घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला. घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून आतमध्ये डोकावले असता पवार यांनी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी त्वरित ही माहिती मुलाला कळविली.
एकाचवेळी मातृ-पितृ छत्र नियतीने हिरावून घेतल्याने या भाऊ बहिणींच्या अश्रुंचा बांध फुटला. दोघेही एकमेकांना धीर देत ढसाढसा रडत होते. मयत रवींद्र पवार हे सातपूर औद्योगिक वसहतीतील एका कंपनीत ठेकेदारीवर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु गेल्या वर्षभरापासून ते घरीच राहत असल्याचे सांगण्यात आले. मयत पवार दाम्पत्याच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.