बहुजननामा ऑनलाईन – कोरोनापासून बचाव करण्यासाठी साबणाने हात धुण्याचा किंवा सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र साबणाने हात धुण्यापेक्षा लोक हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करत आहेत. असे वारंवार हँड सॅनिटायझर वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आता केंद्र सरकारनेही नागरिकांना सावध केले आहे.
हँड सॅनिटायझरचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सॅनिटायझरपेक्षा साबणाचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर. के वर्मा म्हणाले, ही अभूतपूर्व अशी वेळ आहे. एखाद्या व्हायरसचा इतका प्रकोप होईल याचा कुणी विचारही केला नव्हता. स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा. गरम पाणी प्या आणि हात नीट धुवा, सॅनिटायझरचा जास्त वापर करू नका. तज्ज्ञांच्या मते, सॅनिटाझरचा जास्त वापर केल्याने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होऊ शकतो. साबण आणि पाणी असेल तर त्यानेच हात धुवा. साबण नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सर्दी, खोकला असलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्यास, अशा व्यक्तींचे साहित्य उचलल्यास, गर्दीत एखादी अशी संशयित व्यक्ती दिसल्यास तुम्ही हँड सॅनिटायझर वापरायला हवे. जेणेकरून खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर उडणारे थेंब तुमच्या हातामार्फत तुमच्या शरीरात जाणार नाहीत.