मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे कलाविश्वाला मोठा फटका बसला असून छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणार्या कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘हमारी बहू सिल्क’ या मालिकेत काम करणारा अभिनेता झान खानने मानधन न मिळाल्याचे सांगत निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त केला होता. आता याच मालिकेत काम करणार्या अभिनेत्री वंदना विठलानी यांना देखील आर्थिक फटका बसला आहे. त्या सध्या राख्या बनवून घर चालवत असल्याचे समोर आले आहे.
सध्या आर्थिक संकटात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मे महिन्यापासून ते ऑक्टोबर 2019पर्यंत मालिकेचे शूट केले. पण मला फक्त मे महिन्याचे मानधन मिळाले. आता माझी संपूर्ण बचत देखील संपत आली आहे. मला नोव्हेंबर 2019मध्ये मुस्कान या मालिकेमध्ये रोल मिळाला होता. पण ती मालिका देखील दोन महिन्यातच बंद झाली. मला या मालिकेसाठी पैसे मिळाले होत पण ते किती दिवस पुरणार’ असे वंदना म्हणाल्या.
‘मी आता राख्या बनवण्यास सुरुवात केली असून त्या ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मी स्वत:ला कामात व्यस्त ठेवते आणि त्यातून मला थोडे फार पैसे देखील मिळतात. माझे पती विपुल थिएटर आर्टिस्ट आहेत आणि त्यांना देखील कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मी जानेवारी महिन्यात एका मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. पण ते बंद झाले. मी आर्थिक संकटात अडकले आहे. माझ्या मुलांच्या शाळेची आणि कॉलेजची फी भरायची आहे. मी काही प्रोजेक्टसची वाट पाहत आहे’ असे त्यांनी सांगितले.