औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेले महापरीक्षा हे पोर्टल बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांसाठी आज (बुधवार) औरंगाबादेत एक अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. औरंगाबाद शहरातील पैठणगेट येथून या मोर्चाला सुरुवात झाली आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते.
महापरीक्षा पोर्टलवरून घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, तसेच एमपीएसी मार्फत घेण्यात येणारी पीएसआय पूर्व परीक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी, एमपीएससीचे वेळापत्रक अद्यावत करून जागांची आकडेवारी जाहीर करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागा वाढवाव्यात. पोलीस भरतीचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे, इत्यादी मागण्यांसाठी हा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला होता.
राज्यातील विद्यार्थ्यांना सरळ सेवेमार्फत वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांवरुन माहिती घ्यावी लागत होती. त्यावर उपाय म्हणून अलीकडेच फडणवीस सरकारने विविध परीक्षांसाठी एकच महापरीक्षा पोर्टल सुरु केले. विद्यार्थ्यांच्या परीक्षेपासून ते निकालापर्यंत सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना याच पोर्टलवर पाहता येतात.
काय आहेत मागण्या ?
ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी
पीएसआय पूर्व परीक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी
एमपीएससीच्या वेळापत्रकासोबत जागांची आकडेवारी जाहीर करावी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागा वाढवाव्यात
पोलीस भरतीचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे