मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागपूरमध्ये कपड्यांच्या शोरूममधील ट्रायल रूममध्ये छुप्या कॅमेऱ्याने तरुणींच्या चित्रीकरणाची घटना समोर आल्यानंतर नागपूर पोलिस दलातील महिला अधिकारी मैदानात आल्या आहेत. सायबर हॅकर्स हे व्हायरसच्या मदतीने महिला आणि तरुणींच्या स्मार्ट फोनची गॅलरी सहज हॅक करू शकते. महिलांच्या खाजगी क्षणातले फोटो ते कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे मिळवू शकतील. त्यामुळे महिलांनी आणि तरुणीनी स्मार्ट फोन वापरतांना काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांनी आपल्या स्मार्ट फोनमधील गॅलरीला सुरक्षित पासवर्ड ठेवणे आणि आपल्या स्मार्ट फोनमध्ये योग्य ते अँटी व्हायरस ठेवणे गरजेचे आहे. याबद्दलच्या सूचना नागपूर पोलिसांनी दिल्या आहेत.
नागपूर पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना अशा गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी “जागरूक मी व समाज” अशी मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थिनीसोबत संवाद साधत आहे. महिलांना आणि तरुणींना नव्या गेजेट्स आणि टेक्नोलॉजीचा वापर करताना काय सावधगिरी बाळगावी याचे प्रशिक्षण देत आहे.
नागपूरच्या महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनी आणि महिलांना प्रशिक्षण देतांना सायबर सेलच्या प्रमुख डीसीपी श्वेता खेडेकर यांनी सांगितले की, हॅकर्स लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये डोकावू शकत आहेत. हॅकर्स एखाद्याच्या स्मार्ट फोनची गॅलरी ताब्यात घेऊन त्यातील फोटोंचा गैरवापर करणे किंवा कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे तुम्हाला न कळत तुमच्या स्मार्ट फोनद्वारे तुमच्या खाजगी आयुष्याचे फोटो क्लिक करू शकता. त्यामुळे महिलांनी आणि तरुणींनी स्मार्ट फोन वापरतांना काळजी घेणे गरजेचे आहे.