अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबाद येथे एका महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या महिलेचे वय २२ वर्ष असून घडलेल्या प्रकरणाबाबत महिलेने शुक्रवारी तिघींविरोधात वाडज येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर आरोपींमधील एक महिला ही तिच्या पूर्वीच्या प्रियकराची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित महिला चार वर्षांपूर्वी गिरीश गोस्वामी यांच्या नरनपुरा येथे असलेल्या कपड्यांच्या दुकानात कामाला असताना गिरीश आणि ती एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षे प्रेमसंबंधनानंतर त्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर पीडित महिला वस्त्रपुरच्या एका कपड्याच्या दुकानात कामाला लागली. तर एक महिन्यापूर्वी गिरीशची पत्नी जानू गोस्वामी हिला ते दोघे एकमेकांच्या पुन्हा संपर्कात आल्याचे कळाल्यावर तिने पीडितेला फोनवरून धमकी दिली, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार समोर आले आहे.
तक्रारीनुसार पीडित गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या जवळपास वाडज येथून आपल्या घरातून प्रगतीनगर येथे जातक होती. त्याचवेळी जानू आणि तिची मैत्रीण रिंका गोस्वामी या दोघीही स्कुटरवरून आल्या आणि पीडितेला स्कुटरवर बसवून जानूच्या घरी नेले. तर घरी ठकुरी ही त्यांची आणखी एक मैत्रीण उपस्थित होती. त्यावेळी त्यांनी तिला खोलीत कोंडून ठेवले. तर ‘ठकुरी हिने रिंका आणि जानूला माझे कपडे उतरवून गुप्तांगात मिरची पावडर टाकायला सांगितली. नंतर त्यांनी माझया गुप्तांगात पावडर टाकल्यावर मी वेदनेने ओरडलेही. त्यांनी माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओही काढला,’ असेही पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तर गिरीशच्या पत्नीने जानूला धमकावले असून ५० लाखांची मागणी केली आहे. कारण गिरीशने तिच्यावर लाखो रुपये खर्च केले असल्याचा आरोप करत गिरीशला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला तर चेहऱ्यावर ऍसिड फेकेल, अशीही धमकी दिली आहे. यानंतर त्यांनी पीडितेला सोडून दिले. त्या तिघींविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांना अटकही केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक जे. ए. राठवा यांनी दिली.