दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत NDA सरकार भरगोस मतांनी विजयी झाले यासंदर्भात मोदी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत असा मेसेज व्हाट्सअॅपवर व्हायरल होत आहे परंतु ही फेक वेबसाइट तयार करून लोकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या आयआयटी पदवीधराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राकेश जांगीड असं या तरुणाचे नाव असून तब्बल १५ लाख लोकांना या तरुणाने फसवलं असल्याची माहिती.
माहिती चोरणाऱ्या आयआयटी तरुण राकेश जांगीड राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील पुंडलोटाचा रहिवासी आहे. २०१९ मध्ये आयआयटी दिल्ली येथून पदव्युत्तर पदवी त्याने मिळवली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत अशी माहिती देणारा संदेश व्हाट्सअॅपवर राकेश जांगीडने व्हायरल केला. मेक इन इंडियाच्या लोगोसह हा संदेश पाठवण्यात आला असल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला. त्यानुसार तब्बल १५ लाख लोकांनी तिथे नावनोंदणी केली. नावनोंदणी सोबतच आधार कार्ड,बँक खाते अशा अनेक गोपनीय गोष्टींची माहिती या संकेतस्थळावर विचारण्यात आली होती. या माहितीच्या आधारे लोकांना लुटण्याचा या तरुणाचा प्लॅन होता. लॅपटॉपसाठी www.modi-laptop.wishguruji.com या संकेतस्थळावर नावनोंदणी करा असंही या संदेशात सांगण्यात आलं होतं.
या वेबसाइटवर येणाऱ्या ट्रॅफिकच्या साहाय्याने गुगल अॅड्स मिळवून पैसे कमवण्याचा आपला मनसूबा असल्याचं या तरुणाने चौकशीत कबूल केलं आहे. दरम्यान या तरुणाची सखोल चौकशी केली जात असून याशिवाय अजून कोणी अशी फेक वेबसाइट चालवत आहेत का याची माहिती पोलीस काढत आहेत.