बहुजननामा ऑनलाइन टीम – रेडिओ खगोलशास्राचे जनक व खोडद रेडिओ दुर्बीण प्रकल्पाचे निर्माते वैज्ञानिक डॉ. गोविंद स्वरूप (वय 91) यांचे काल सायंकाळी खासगी रूग्णालयात निधन झाले. भारताला खगोल विज्ञान क्षेत्रात अव्वल स्थानी नेण्यात डॉ स्वरूप यांच्या संशोधनाचा सिंहाचा वाटा आहे.
फादर ऑफ इंडियन रेडिओ स्ट्रॉनॉमी अशी ओळख असलेले डॉक्टर गोविंद स्वरूप यांचा जन्म उत्तराखंड राज्यात मुरादाबाद जिल्ह्यामध्ये झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. महाविद्यालयीन शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झाले होते. डॉ. स्वरूप यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेत काम केले. तिथे काम करताना ऑस्ट्रेलियात रेडिओ खगोलशास्त्राच्या शिक्षणासाठी संधी मिळाली होती.
दरम्यान, 1990 च्या दशकात डॉक्टर स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील खोडद(ता.जुन्नर) गावात मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली. जीएमआरटी म्हणून या रेडिओ दुर्बिणीचा जगभर लौकिक झालेला आहे. डॉक्टर स्वरूप यांना भारत सरकारच्या पद्मश्री, ब्रिटन सरकारचा ग्रेट रेबर यासह जगभरातील विविध वैज्ञानिक संस्थांचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.