बहुजननामा ऑनलाइन टीम – काही दिवसांपूर्वी राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसांचा आठवडा राज्य सरकारने जाहीर केला. तेव्हापासून मात्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच चंगळ होणार आहे कारण त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यात भरमसाठ वाढ होणार आहे. २०२० मध्ये आता उरलेल्या ३०७ दिवसामध्ये तब्बल १०२ सुट्या मिळणार आहेत.
नव्या निर्णयामुळे अतिरिक्त शनिवारच्या एकूण ४४ सुट्या त्यांना अधिक मिळत आहेत. त्यात या कर्मचाऱ्यांना सलग सुट्या घेण्याची संधी आता उर्वरीत सात महिन्यात ११ वेळा मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांच्या जागा वर्षभरात शेकड्याहून अधिक दिवस रिक्त दिसणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयात या कर्मचाऱ्यांना ४५ मिनीटांचे अतिरिक्त काम दिले असले तरी या वर्षातील उरलेल्या कार्यालयीन कामकाजाच्या २०५ दिवसात ते केवळ नऊ हजार २२५ मिनीटे अधिक होते. मात्र ते वाढलेल्या सुट्यांच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे.
सलग सुट्या या महिन्यात
सलग सुट्याचे चित्र सरकारी कार्यालयात मार्च, एप्रिल, मे,ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दिसणार आहे. या महिन्यात कर्मचारी शनिवारला लागून सुट्या आल्याने सलग तीन अथवा चार दिवस कार्यालयात दिसणार नाहीत. सात आणि आठ मार्चच्या शनिवार-रविवारच्या सुट्यांना लागून नऊ तारखेची रजा टाकली की १० मार्चला धुलीवंदनाची सुटी आहे. त्यामुळे त्यांना सलग चार दिवस सुटी घेता येणार आहे. काही कर्मचारी गुढी पाडवा साजरा करण्यासाठी २१, २२ मार्चला जोडून २३, २४ची रजा टाकून गुढी पाडव्यापर्यंत सुटीवर राहतील.
जोडून सुट्या घेण्याची संधी
दोन ते सहा एप्रिल रामनवमी ते महावीर जयंती असे चार दिवस, १० एप्रिल ते १४ एप्रिल म्हणजे गुड फ्रायडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे चार दिवस सुटी घेऊ शकतात. मे महिन्यात या कर्मचाऱ्यांना एक ते तीन मे आणि २३ ते २५ मे असे दोन वेळा तीन दिवस रजा घेण्याची संधी आहे. ऑक्टोबर महिन्यात ३० तारखेला ईद शुक्रवारी असल्याने सलग तीन दिवस, नोव्हेंबर महिना हा दिवाळी सणाचा महिना असल्याने १४ ते १६ आणि २८ ते ३० अशी सलग सुट्यांची संधी आहे. वर्षअखेरीस नाताळ हा सण देखील शुक्रवारी येत असल्याने २५ ते २७ किंवा त्यापेक्षा अधिक काळ रजेवर जाण्याची संधी हे कर्मचारी साधू शकतात.
प्रत्येक महिन्यातील सुट्यांचे दिवस
मार्च – ११ दिवस
एप्रिल – १२ दिवस
मे – १३ दिवस
जून – ८ दिवस
जुलै – ८ दिवस
ऑगस्ट- ११ दिवस
सप्टेंबर – ८ दिवस
ऑक्टोबर – ११ दिवस
नोव्हेंबर – ११ दिवस
डिसेंबर – ९ दिवस