बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे. सर्वच व्यवहार पूर्ववत होत आहेत. असे असताना रेल्वेच्या काही सेवाही पूर्वीप्रमाणेच सुरु केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली.
रेल्वेने प्रवाशांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. यूटीएस मोबाईल ऍपच्या (UTS Mobile App) माध्यमातून विनाआरक्षित (General) तिकीटांची विक्री पुन्हा सुरु करणार आहे. तिकीट काऊंटरवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी ही सेवा ऍपच्या माध्यमातून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. या निर्णयाचा फायदा हजारो रेल्वे प्रवाशांना होणार आहे.
ऍपच्या माध्यमातून करता येऊ शकते तिकीट बुक
तिकीट काऊंटरवर होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने UTS मोबाईल ऍपच्या माध्यमातून तिकीट विक्री पुन्हा एकदा सुरु केली आहे. या ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना रेल्वे आणि प्लॅटफॉर्म तिकीट मिळू शकेल.
असे करा तिकीट बुक…
– गुगल प्लेस्टोरवरून UTS App डाऊनलोड करा
– तुमचे नाव, मोबाईल नंबर, आयडी कार्ड नंबर नोंद करा
– त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल
– रजिस्टर केल्यानंतर एक OTP मोबाईलवर येईल
– त्यानंतर Sign Up करा
– आयडी आणि पासवर्ड तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर येईल
– त्यानंतर तुम्ही UTS ऍपवर लॉग इन करू शकता.
4 तिकीट करता येऊ शकतील बुक
प्रवाशांना PNR नंबर दिला जाईल. ज्यामध्ये PNR वर प्रवासी जास्तीत जास्त 4 तिकीट बुक करू शकतील. या तिकीटाचे पैसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा पेटीएम यांसारख्या माध्यमातून देता येऊ शकतील.