पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राजकीय जीवनात एकमेकांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक होत असते. त्यावर आता संजय राऊत यांनी सांगितले, की देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला संवाद आहे. त्यामुळे त्यांची मुलाखत मी घेणारच.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विविध मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका केली जात आहे. पण आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचे सांगितले. पेपर न होता रिझल्ट बघायला मिळेल. मात्र, त्यांची मुलाखत कधी घेणार याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. तसेच ते म्हणाले, धोरणांवर टीका म्हणजे मोदींवर टीका नाही. पूर्वीच्या सेलिब्रिटींचा चळवळींशी संबंध होता आणि त्याचं राष्ट्रीय भान होते, असे म्हणत त्यांनी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली.
विरोधकांमुळे धार्मिक स्थळे सुरु
विरोधकांनी धार्मिक राजकारण करत मंदिरे उघडायला लावली. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता याचे उत्तर देणार तरी कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे ते मास्तरांच्या भूमिकेत आहेत आणि कोरोना स्थिती चांगली हाताळताहेत, असेही ते म्हणाले.