बहुजननामा : ऑनलाईन टीम – देशामध्ये सोन्याचे भाव पहिल्यांदा 50 हजारांच्या वर गेले आहेत. जगभरात सोन्याची वाढलेली मागणी आणि रुपया घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये ही वाढ झाली आहे. मुंबई रिटेल मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या किंमतीत ही वाढ पाहायला मिळाली. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 50 हजार 50 रुपये प्रति तोळा झाले आहेत तर मुंबईमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 50 हजार 120 रुपयांवर पोहोचले आहेत.
देशामध्ये विविध राज्यांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये फरक आढळून येत आहे.
संबंधित किंमती एक्साइज ड्यूट, स्टेट टॅक्स आणि मेकिंग चार्जेस नुसार ठरवल्या जातात. परिणामी प्रत्येक राज्यात काहीशा फरकाने वेगवेगळ्या किंमती असू शकतात. मात्र आज देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याने 50 हजारांचा दर पार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 788 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत आहेत. तर चांदीचे भाव 18.35 डॉलर प्रति औंस आहेत.
अमेरिकेत देखील सोन्याचे भाव 8 वर्षातील उच्चतम स्तरावर आहेत. शेअर मार्केटमध्ये होणारी घसरण, लॉकडाऊनमुळे विविध व्यवसायामध्ये सुरू असणारी कमजोर स्थिती त्याचप्रमाणे जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी व्याजदर घटवल्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. या सर्व सकंटाच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गंतवणूक म्हणून पाहिले जाते. भविष्यात सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.