बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना (Coronavirus) संकटाच्या काळात महागलेले सोनं आता कोरोना व्हॅक्सिनबाबत (Vaccine) आलेल्या बातम्यांमुळे सोन्यामध्ये (Gold Rate) घसरण होताना पहायला मिळत आहे. ऑगस्टमध्ये उच्चांक गाठल्यानंतर सातत्याने सोनं स्वस्त होत आहे. काहीवेळा दर वाढलाही मात्र त्या तुलनेत किंमत कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे.
शुक्रवारीसुद्धा सोन्याच्या किंमती कमी झाल्या. गुरूवारच्या तुलनेत सोन्याचे दर शुक्रवारी 94 रुपयांनी कमी झाले होते. त्यामुळे सोन्याचा दर 49 हजार 97 रुपये प्रति दहा ग्रॅम असा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली. तर डिसेंबरमध्येही तसंच काही चित्र आहे. पहिल्या आठवड्यात मात्र किंमतीत 490 रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदी जवळपास तीन हजार रुपयांनी वधारली होती.
दिल्लीतील सराफा बाजारत शुक्रवारी सोन्याची किंमत 102 रुपयांनी कमी झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला 48 हजार 594 रुपये इतका झाला. त्यापूर्वी सोन्याचा दर 48 हजार 696 रुपये इतका होता. तर चांदीच्या दरात मात्र केवळ 16 रुपयांची घट झाली. शुक्रवारी चांदीचा भाव 62 हजार 734 रुपये प्रति किलोग्रॅम होता. त्यापूर्वी चांदीचा दर 62 हजार 750 रुपये प्रति किलो होता.
ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56 हजार 254 रुपयांवर पोहचला. तर चांदी 76008 रुपये प्रति किलो इतकी झाली होती. मात्र नंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत आहे. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना व्हॅक्सिनमुळे शेअर बाजार वधारला असून सोन्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता असून सोनं 42 हजार रुपयांपर्यंत किंमत कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.