बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेमध्ये अंदाजापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सुरु झालेली नव्या घरांची विक्री आणि रिचमंड मॅन्यूफॅक्चरिंग आकडेवारी नुसार सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी होऊन 1920 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आर्थिक आकड्यांमुळे अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ, कोरोना व्हायरसच्या उपचारासंदर्भात वाढणाऱ्या आशा आणि अमेरिका-चीनमध्ये ट्रेड डीलची शक्यता या सर्वामुळे सोन्याचांदीच्या दरावर दबाव वाढत आहे. याच संकेतामुळे आज देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी होऊ शकतात.
आठवड्यात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण
सोमवारी किरकोळ घसरणीनंतर मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमती 52907 रुपये प्रति तोळ्यावर कमी होऊन 55350 रुपये प्रति तोळा झाली आहे. या दरम्यान किंमतीमध्ये 557 रुपये प्रति तोळा घसरण झाली. तर मुंबईत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होऊन 51628 रुपये प्रति तोळा झाले आहेत. या आठवड्यामध्ये साधारण 1500 रुपये प्रति तोळ्याने सोन्याचे भाव कमी झालेत. मंगळवारी चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. दिल्लीत एक किलो चांदीचा भाव 68342 रुपये होता. तो कमी होऊन 66737 रुपये झाला आहे. याच दरम्यान चांदीचे भाव 1606 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईमध्ये चांदीचे दर कमी होऊन 64881 रुपये प्रति किलो आहेत.
आज काय होणार ?
तज्ज्ञांच्या मते रुपयांमध्ये आलेल्या मजबुतीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात. बूलियन मार्केटच्या नजरा आता अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे खिळल्या आहेत. या भाषणानंतर डॉलरची परिस्थिती लक्षात येईल, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो.