नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने प्रति १० ग्रॅममागे ४३ हजार रुपये असून गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०० रु. नी वाढत सोने प्रति १० ग्रॅम ४३ हजार १७० रु. पर्यंत गेला आहे. एकीकडे लग्नाचा सीजन आणि कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीकडे लक्ष वळले असून सहाव्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
बुधवारीच मुंबई आणि इतर शहरात सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सोन्याचा भावात ४५० रु.नी वाढ झाली असून चांदीचा भावही प्रति किलो ५०० ते १००० रु. नी वाढला आहे. हाच दर गुरुवारी प्रतिकिलो ४८,६०० रु. असताना जागतिक बाजारात भारतीय रुपयाची किंमत घसरली आहे. त्यामुळेच सोन्याच्या भावात आणखी वाढ झाली आहे.
मागच्या काही दिवसात सोन्याच्या दरात १५०० रुपयांनी वाढ झाली असून चांदीचेही भाव वाढले आहेत. तसेच लग्नाचा सीजन येणार असल्याने सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असून त्याचे दर अजूनच वाढू शकतात.
सोन्याची मागणी लग्नसराईमुळे वाढली असून त्याचा फटका देशांतर्गत सराफ बाजारातही बघायला मिळेल. तर कोरोनामुळेही सोन्याचे भाव वाढले आहेत. एचडीएफसी सेक्युरिटीजचे सीनियर अनॅलिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर सोन्याची किंमत १,६०२ डॉलर आहे.