बहुजननामा ऑनलाइन टीम – धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पाडव्यादिवशी सोन्या-चांदीचे खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यातच आता लग्नसराईचे दिवसही जवळ आहेत. त्यामुळे या काळात आवर्जून सोने खरेदी केले जाते. याच कारणामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ( dhanteras ) सोन्या-चांदीच्या किमतीत(Gold and silver) वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात याच दिवशी सोन्याला मागणी वाढल्याने मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे, असे असले तरी जाणकारांच्या मते पुढच्या काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ किंवा घट होण्याची शक्यता नाही.
दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली. सोन्याची नवी किंमत (Gold Price) या बाजारात 241 रुपये प्रतितोळ्याने जास्त झाली. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 10 ग्रॅमला 50,425 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वीचा गुरुवारचा दर 50,184 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,880 डॉलर प्रतिऔंस एवढा राहिला आहे.
वाळीत जर तुम्ही सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोन्याच्या शुद्धतेबद्दल माहीत असणे गरजेचे आहे. कारण बर्याच वेळा ग्राहक सोन्याची शुद्धता ओळखत नाहीत, यामुळे त्यांचे नुकसान होते. सोने खरेदी करण्याआधी तुम्हाला 14 कॅरेट ते 24 कॅरेटपासून सोन्याची किंमत माहीत असावी. आज आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BSI ) मते सोन्याची शुद्धता तपासण्याचे चार प्रमुख मार्ग आहेत.
BSI करते हॉलमार्क
BSI हॉलमार्क ही देशातील एकमेव एजन्सी आहे, जी सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्किंग करते. भारत सरकारच्या वतीने सोन्याची शुद्धता तपासण्याचे काम या एजन्सीमार्फत केले जाते. आजच्या काळात सर्व ज्वेलर्स हॉलमार्क केलेले दागिने विकत नाहीत. काहीजण स्वत: हॉलमार्किंग करतात, म्हणून खरेदी करण्यापूर्वी आपण खरेदी केलेल्या दागिन्यांमध्ये बीएसआय हॉलमार्क केलेला आहे की नाही ते पाहा.
सोने खरेदीपूर्वी जाणून घ्या दर
सोने खरेदी करण्याआधी तुम्हाला दर माहीत असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट वर भेट देऊन सध्याचे चालू दर शोधू शकता. या वेबसाइटवर दिलेल्या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नसतो.
सोने खरेदी बिल मागून घ्या
तसेच तुम्ही दागदागिने खरेदी करणार असाल तर नक्कीच बिल मागून घ्या. या बिलमध्ये सोन्याची शुद्धता आणि दर इत्यादींची माहिती ठेवली आहे. आपल्याकडे बिल नसल्यास आपण सोन्याची विक्री करू शकत नाही.