नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनावर प्रभावी ठरणारे फेविपिरावीर औषध भारतात उपलब्ध झाले आहे. औषध तयार करणार्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने यासंदर्भातला दावा केला आहे. या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवणार्या रुग्णांना हे औषध दिले जाऊ शकते. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध आणले आहे.
ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लूच्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे. भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला संमती देण्यात आली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले. कोरोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधउपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
औषधाच्या एका गोळीची किंमत 103 रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी 1800 मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. तर 14 दिवसांपर्यंत 800 मिलिग्रॅमचे दोन डोस रोज घ्यायचे आहेत.कोरोनाचा प्रभाव वाढत असताना ग्लेनमार्क या कंपनीने करोनावर प्रभावी ठरणारे फेविपिरावीर औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे.