बहुजननामा ऑनलाईन टीम – सोलापुरात घडली धक्कादायक घटना. शिक्षणासाठी फी भरायला पैसे नसल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. सोलापुरातील मोहळ येथील देगाव या गावात ही दुर्दैवी घटना घडली. रुपाली रामकृष्ण पवार असे या मुलीचे नाव आहे. पंजाबच्या जालिंदर येथील लव्हली प्रोफेशनल अकॅडमीला बीटेकसाठी रुपालीचा प्रवेश निश्चित झाला होता.
प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी पात्रता परीक्षेत रुपालीने ८९ टक्के मिळवले होते. १ लाख १० हजार रुपये फी प्रवेशासाठी भरणे आवश्यक होते. १० हजार रुपये अॅडव्हान्स रक्कम भरून रुपालीने आपला प्रवेश निश्चित केला होता. तर उर्वरित रक्कम भरण्यासाठी २० जुलैची मुदत होती. मात्र मुदतीत फी भरणे शक्य नाही झाल्याने रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी किटकनाशनक पिऊन आयुष्य संपवले.
या घटनेनंतर गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुपालीचे वडील गावातच एका शेतात मजुरीचे काम करत होते. शिक्षणासाठी रुपालीच्या वडिलांनी शेती देखील विकायला काढली होती. शेतीला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतीची विक्री झाली नाही. या सर्व प्रकरणात आपल्या परिवाराची होरपळ सहन न झाल्याने तसेच शिक्षणात हुशार असून देखील अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याने रुपालीने आपले आयुष्य संपवले.