पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी येथील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिला पेशंटचा विनयभंग केल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.२३) दुपारी अडीचच्या सुमारास पिंपरीतील डी.वाय. पाटील रुग्णालयातील वॉर्ड नं. ५८ मधील लेबर रुममध्ये घडली.
याप्रकरणी २० वर्षीय पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. हर्षल बसवराज निबन्नवर (वय २८, रा. तुलीप हाईट्स वाघेरे टॉवर, नेहरुनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला काल दुपारी पिंपरीतील डी.वाय. पाटील रुग्णालायात उपचारासाठी गेली होती. त्यावेळी डॉ. हर्षल याने उपचाराच्या बहाण्याने तरुणीच्या अंगाला वारंवार हात लावला. तसेच तिची तपासणी करताना तिला लज्जा वाटेल अशा ठिकाणी हात लावून तिचा विनयभंग केला. तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र आरोपी डॉक्टरला अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.