बहुजननामा ऑनलाईन टीम : गाझियाबादमधील साहिबाबाद पोलिस स्टेशन भागातून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ९ ऑक्टोबरला एलएलबी विद्यार्थ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली मृत विद्यार्थ्यांची प्रेमिका आणि तिच्या पालकांना अटक करण्यात आली आहे. पंकज असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजचे आपल्या आधीच्या घरमालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते, ज्यामुळे घरमालक आणि त्याच्या पत्नीने पंकजच्या हत्येचा कट रचला होता. त्यात पंकजच्या मैत्रिणीलाही तिच्या कुटुंबियांनी आपल्यात सामील करून घेतले आणि त्यानंतर पंकजला ठार मारण्याचा कट रचला गेला.
इतकेच नव्हे तर त्याचा मृतदेह लपविण्यासाठी हत्येच्या ४ दिवस आधीच दहा फूट खोल खड्डा घरात खोदला गेला होता. हत्येच्या योजनेचा एक भाग म्हणून, त्या घरमालकाने पंकजला त्याच्या मैत्रिणीद्वारे फोन करून आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. आधीच खोदलेल्या दहा फूट खोल खड्ड्यात त्याचा मृतदेह लपविल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला.
युवकाच्या बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता, परंतु सर्व आरोपी फरार झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत अधिकारी राकेशकुमार मिश्रा यांनी सांगितले की, पंकज साहिबाबाद परिसरातील महाविद्यालयात एलएलबी शिकत होता. तो सायबर कॅफे देखील चालवत होता. गिरधर एन्क्लेव्ह कॉलनीत राहणाऱ्या त्याच्या घरमालक मुन्ना उर्फ हरिओमच्या मुलीशी पंकजचे प्रेम प्रकरण चालू होते. अटक केलेल्या आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे.