नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी गँगस्टर अरुण गवळी हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्या विरोधात आता त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. न्या.आर. भानुमती आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी चालू असून कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. गवळीला दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालायने कायम ठेवली असून सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणातील कोर्टाने दोषी ठरवले असून या खटल्यात १५ आरोपींपैकी अरुण गवळीसह १२ जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवले आहे. यात ३ जणांची मात्र पुरावा नसल्या कारणाने निर्दोष सुटका झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक जामसंडेकर यांची २ मार्च २००७ ला मुंबईतल्या घाटकोपर असल्फा येथे हत्या करण्यात आली होती.
जामसंडेकर हे त्यांच्या घरात बसलेले असताना अज्ञात मारेकाऱ्यांनी घरात घुसून त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. त्यांच्या हत्येची सुपारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी साहेबराव भिंताडे यांनी दिली असल्याचे सिद्ध झाले होते. साहेबराव हे शिवसेनेत उपशाखाप्रमुख असताना जामसंडेकर हे त्यांचे सहकारी होते.
Visit : bahujannama.com