बहुजननामा ऑनलाइन : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम असलेल्या गगनयान मध्ये महिला अंतराळवीराचा समावेश नसेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी स्पष्ट केले. लष्करातील वैमानिकांना या मोहिमेसाठी इस्रो प्रशिक्षण देणार असून सध्यातरी कोणत्याही दलामध्ये त्या श्रेणीतील महिला वैमानिक नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
गगनयान मोहिमेसाठी भारताने रशियाबरोबरच फ्रान्सशीही सहकार्याचा करार केला आहे. पुढील महिन्यात या मोहिमेसाठी संभाव्य असणाऱ्या अंतराळवीरांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यानंतर निवड झालेल्या वैमानिकांना नोव्हेंबरमध्ये रशियात प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.
इस्रोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘गगनयानाचे पहिले उड्डाण सन २०२२ मध्ये होणार असून, तीन अंतराळवीर या यानात असतील. पहिल्या उड्डाणात जरी महिला अंतराळवीर नसली तरी भविष्यातील इतर उड्डाणांमध्ये सामान्य लोकांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यात महिलाही असतील.’ तसेच काही दिवसांपूर्वी उड्डाण घेतलेल्या ‘चांद्रयान-२’ने बुधवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून या यानाने चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. नियोजित वेळेनुसार सकाळी ९ वाजून ०४ मिनिटांनी यान या कक्षेत पोहोचले. श्रीहरिकोटातून २२ जुलैला हे यान अवकाशात झेपावले होते. ७ सप्टेंबर रोजी सकाळी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.