नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – शहादा तालुक्यातील वडाळी येथे गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी (समाधीस्थळ) मंजूर करुन सदर जागेला वॉल कंपाऊंड व शोकसभा शेडसाठी जनसुविधा योजनेतून २० लाख रुपये मंजूर करण्यात यावे, अशी मागणी दशनाम गोसावी समाजाने केली असून याबाबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गोसावी समाजात व्यक्तीच्या निधनानंतर अग्निडाग न देता समाधीविधी करण्याची प्रथा आहे. यामुळे वडाळी येथे दफनभूमीची नितांत आवश्यकता आहे. एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या गोसावी समाज असतांनाही येथे दफनभूमीसाठी जागा मिळालेली नाही. शासनाने दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे ग्रामसभा ठरावाची त्रृटी दशनाम गोसावी समाजाने पूर्ण केली असून दि.२५ ऑगस्ट २०१८ रोजी ग्रामसभा ठराव क्र.९ नुसार ग्रामपंचायत वडाळीकडून गट नं.८३ मध्ये १ हेक्टर जागा मंजूर होण्यासाठी ग्रामसभेने परवानगी दिली आहे. यामुळे सदर जागेवर समाधीस्थळ मंजूर होवून वॉलकंपाऊंड व शोकसभा शेडसाठी २० लाख रुपये इतका निधी जनसुविधा योजनेतून मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर यशवंत गोसावी, अभय गोसावी, गजेंद्र गोसावी, मनोज गोसावी, संजय गोसावी यांच्या सह्या आहेत.