मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे व लोकनेते भाऊसाहेब देसले प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘युगंधराला स्वरांजली’ या बुद्ध-भिम गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
प्रत्येक भारतीयाच्या ह्रदयात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अढळ आहे. त्यांचे मौलिक विचार सर्वांनी अंगिकारावे. मुरबाड नगर पंचायतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ही पूर्णाकृती पुतळ्यास मान्यता दिली असून येत्या वर्षभरात मुरबाड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मानासन्मानाने उभा राहणार असल्याचे मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी कार्यक्रमा प्रसंगी सांगितले.या वेळी नगराध्यक्षा छाया चौधरी,डी वाय एस पी डॉ बसवराज शिवपूजे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांसह इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा रिपाइं सेक्युलर पक्षा कडून जनहितार्थ दरवर्षा प्रमाणे कोणताही अभिवादनाचा सामूहिक कार्यक्रम यंदा आयोजीत करण्यात आला नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य कटआऊट लाऊन त्यांना रिपाइं सेक्युलर व लोकनेते दिलीप चंदणे सेवाभावी संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदणे सह मुरबाड पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे विनायक खेडकर,सेक्युलर व सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अभिवादना नंतर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला मुरबाड शहर मुख्य बाजारपेठे मधून कँडल मार्च डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत रात्री १२ वाजता काढण्यात आला. या मार्च मध्ये युवकांसह महिला वर्गाने मोठी उपस्थित दाखवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या प्रसंगी सर्व उपस्थितानी विनम्र अभिवादन केले.