सांगली : बहुजननामा ऑनलाइन – सांगली येथे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करीत वाहन ढकलण्याचे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे आंदोलन केले गेले. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सांगली विजयनगर येथून दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आल्या.
यावेळी इंधन दरवाढीविरोधात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ मागे घेण्याचीही त्यावेळी मागणी करण्यात आली. आंदोलनावेळी राहुल पवार म्हणाले की, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्यांना महागाईच्या आगीत ढकलण्यात आले आहे. केंद्र सरकारने उद्योगपतींना जगविण्याचे काम करताना सामान्य लोकांना उद्धवस्त करण्याचे काम सुरू केले आहे.
‘अच्छे दिन’ ते नेमके कोणासाठी आणत आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. रोजंदारीवर ज्यांचे घर चालते त्यांनी गॅस विकत घ्यायचा कसा, असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे आम्ही या गॅस दरवाढीचा निषेध करीत आहोत. केंद्र शासनाने सर्व इंधनांवरील दरवाढ मागे घ्यावी, गॅसवरील अनुदान तातडीने सुरू करावे, अन्यथा टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करीत राहू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने उत्तर प्रदेशातील बलात्कारप्रकरणी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा विनया पाठक म्हणाल्या की, संपूर्ण देशात महिला आत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. देशातील एकूण महिला आत्याचाराच्या घटनेपैकी एकट्या उत्तर प्रदेशात १५ टक्के घटना घडल्या. त्यामुळे उत्तर प्रदेश हे सर्वात असुरक्षित राज्य आहे. योगी सरकारच्या काळात यात वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करीत आहोत, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने त्यावेळी सांगण्यात आले.