पंचकुला (उमंग) : वृत्तसंस्था – रायपुर रानीमधील त्रिलोकपुरमध्ये हिमाचल प्रदेशातील दोन अल्पवयीन मुलींसोबत वाईट कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे. आरोपी बाबाला शुक्रवारी पंचकुला कोर्टात हजर केले जाणार आहे. आरोपीने रायपुर रानीच्या छोटा त्रिलोकपुर आश्रमात बलात्काराचा गुन्हा केला होता. दोन्ही पीडित मुली अल्पवयीन आहेत. एकीचे वय 12 तर दुसरीचे 14 वर्षे आहे. मंगळवारी सायंकाळी उशीरा पंचकुलातील महिला पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आरोपीच्या चौकशीत खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. बाबाने सांगितले की, मुलींना भूताची भिती दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला. बाबाने मुलींना म्हटले की, जर त्यांनी त्याचे ऐकले नाही तर त्यांच्यावर भूत सोडले जाईल.
महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, हरियाणाच्या कालकातील रायपुर रानीमधील छोटा त्रिलोकपुर आश्रमातील ही घटना आहे. हिमाचलमधील बद्दीच्या दोन मुली आपल्या भावांसोबत आश्रमात आल्या होत्या. दोन्ही मुलींचा आरोप आहे की, दोघींसोबत तीन दिवस वाईट कृत्य करण्यात आले. यावेळी त्यांना वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले होते आणि भावांना भेटू दिले नाही.
पीडित मुलींनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, अल्पवयीन मुलींचे म्हणणे आहे की, त्यांना आश्रमात सेवा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. एफआयआर दाखल केल्यानंतर पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.