पॅरिस : वृत्तसंस्था – एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना आता फ्रांसमध्ये एका नव्या व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. मात्र माणसाला तसं घाबरण्याचे कारण नाही कारण हा व्हायरस माणसांवर नाही तर टोमॅटो च्या पिकांवर हल्ला करीत आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये सध्या टोमॅटोची शेत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
विषाणूच्या संक्रमणावर उपचार नाही
फ्रान्सच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फिनिस्टरमध्ये टोमॅटोच्या झाडांवर एक घातक विषाणू संक्रमित झाला आहे. या संक्रमणामुळे पूर्ण शेत उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने सांगितलं की, या घातक विषाणूच्या संक्रमणावर कोणाताही उपचार नाही, त्यामुळे टोमॅटोच्या शेतीला पूर्णपणे वेगळं करण्यात आलं आहे. तसंच टोमॅटो असलेले ग्रीनहाऊसही नष्ट केले जाणार आहेत.
सर्वात जास्त टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या देशांना धोका
या विषाणूची लागण झाल्यानंतर टोमॅटो खाण्यालायक राहत नाही आणि त्यांच्यावर डाग पडतात. या विषाणूचा माणसांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र टोमॅटोच्या झाडांना विषाणूची लागण झाल्याने टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.फ्रान्सप्रमाणेच इटली आणि स्पेनमध्येही टोमॅटोच्या झाडांना या व्हायरसची लागण झाली आहे. युरोपियन युनियनमध्ये स्पेन आणि इटली टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन घेणारे देश आहेत. मात्र या ठिकाणीदेखील टोमॅटोंना विषाणूची लागण झाल्याने शेत नष्ट केलं जात आहे.
युरोप आणि अमेरिकामध्ये पसरण्यापूर्वी या घातक विषाणूबाबत सर्वात आधी 2014 साली इज्राइलमध्ये माहिती झाली होती. मात्र जुलै 2018 साली ब्रिटनमध्ये या विषाणूचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर टोमॅटोची बियाणं आणि झाडांची चाचणी आणि निरीक्षण केलं जाईल, असं फ्रान्सने फेब्रुवारीच्या सुरुवातीला म्हटलं होतं. तरीदेखील फ्रान्समध्ये या घातक विषाणूने आपले हातपाय पसरलेच.