नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सावधान इंडिया ‘ या लोकप्रिय टीव्ही शो मधून काम केलेले सुशांत सिंह आता आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी ईशा फाउंडेशन चे अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु सदगुरु जग्गी वासुदेव यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांतने सोशल मीडियावर जग्गी वासुदेव यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत ने वासुदेव यांच्या योग कार्यक्रमाची निंदा केली आहे. ही बाब त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून सांगितली आहे.
काय आहे प्रकरण ?
त्याचे झाले असे की, सद्गुरुंनी त्यांच्या योग कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी एक ट्विट केले गेले होते. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओत सुशांत देखील दिसत होते. या व्हिडिओवर आक्षेप घेत सुशांतने जग्गी वासुदेव यांना लक्ष्य केले आहे. सुशांत म्हणाला, सद्गुरु मी तुम्हाला माझी छायाचित्रे वापरण्याची परवानगी दिली होती का ? यानंतरही आपण माझा फोटो वापरला आहे . तर तुमच्या योग कार्यक्रमात सामील झाल्यावर मी आणि माझी पत्नीने जो अभिप्राय दिला होता तो देखील सांगा.
माझ्या जीवनातील सर्वात वाईट अनुभव
सुशांतने पुढे लिहिले की, ‘हा आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता. आपण दोन दिवसात 6 प्रकारचे कपडे बदलले होते. मात्र सुशांतच्या वक्तव्यावर जग्गी वासुदेव यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी सुशांत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि जेएनयू हिंसाचाराला विरोध दर्शविताना दिसले होते. जेएनयू हिंसाचाराविरोधात मुंबईत निदर्शने करण्यातही ते सहभागी होते.