बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकार्याला मारहाण केली. भाजपाने हा मुद्दा लावून धरताना सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. मदन शर्मा असे मारहाण झालेल्या या अधिकार्याचे नाव आहे. ‘कायदा-सुव्यवस्थान संभाळणे जमत नसेल, तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी या अधिकार्याने केली. त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.
महाशय जी काही मागणी करतील ती करूद्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी 20 जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल असे अग्रलेखात म्हटले आहे. मुंबईत मदन शर्मा नामक एका निवृत्त नौदल अधिकार्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला, याचे समर्थन कोणी करणार नाही, त्याचा निषेध व्हायलाच हवा; पण हे जे कोणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत, त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कोणी शिकविले नव्हते काय? तुम्ही ज्या राज्यात राहता, कमवताय, सुखाने जगताय त्या राज्यातील नेत्यांविषयी काहीही वेडेवाकडे बोलायचे व त्यावर संतापलेल्या कोणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार, स्वातंत्र्यावर घाला वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करायचे असे अग्रलेखात म्हटले आहे. त्यामुळे कंगणानंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडून वाद सुरु असल्याची चर्चा आहे.