औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – सोमवारी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर उपोषण केले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही व्यासपीठावर उपस्थित होते. तिथे फडणवीस हे हातात बूट घेऊन उभे असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीने हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला असून व्हायरल होत आहे. तसेच फडणवीस यांनी हातात बूट का घेतले आहेत, याबद्दल चर्चा चालू आहे.
पंकजा मुंडे करत असलेल्या उपोषणस्थळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रासप नेते महादेव जानकर तसेच फडणवीस हेही उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी भाषण करत मराठवाड्याचे नुकसान करू नका, असा इशाराच सत्ताधाऱ्यांना दिला. पण त्यांच्या हातात असलेल्या बुटांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले असून त्याबाबत चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फडणवीस यांचा तो फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच राष्ट्रवादीने फडणवीसांवर टीकाही केली आहे. फडणवीस हे गेली पाच वर्षे राज्याच्या वेगवान विकासाबद्दल घसा ताणून सांगत होते. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे ढोल बडवून सांगत होते. तेच फडणवीस आता आंदोलनात सहभागी होत आहेत. पण आंदोलनस्थळी असलेल्या आपल्याच लोकांवर त्यांचा विश्वास नाही. आपण चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं त्यांना वाटत असावं. त्यामुळंच बूट हातात घेऊन त्यांनी भाषण केलं, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Visit : bahujannama.com