पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे सदस्य रंजन गोगोई यांनी एका कार्यक्रमात बोलताना धक्कादायक विधान केले होते. गोगोई यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी या विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना ? अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलताना माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी धक्कादायक विधान केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत शंका उपस्थित केली. शरद पवार म्हणाले, राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश यांनी जे काल विधान केले आहे. ते अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना ? हे मला ठाऊक नाही. तसेच त्यांनी केलेलं विधान प्रत्येकासाठी चिंता निर्माण करणारे ठरणार आहे, या बद्दल माझ्या मनात शंका नाही, असे शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले होते रंजन गोगोई ?
रंजन गोगोई यांनी त्याच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाचा निवाडा स्वत:च केला होता, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का ? असा प्रश्न गोगोई यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गोगोई म्हणाले, मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणं परवडते, इतरांना नाही. जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचे मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं विधान गोगोई यांनी केले होते.