बीड : बहुजननामा ऑनलाईन – केजच्या भाजपच्या माजी आमदार संगीत ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश केज प्रथमवर्ग न्यायालयाने दिला आहे. या आदेशाविरोधात ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान दिले असताना हा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर बनावट सही करून आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरून संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पतीला यांच्याविरोधात फसवणूक आणि इतर गुन्हे नोंदवून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
संगीत या सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक असून त्यांचे पती सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. पण गिरणीचे संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांची बनावट सही करत संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांनी न्यायालयात तक्रार केली होती. यामुळे शासनाचीही फसवणूक केल्याचा आरोप कांबळे यांनी केला होता.
या प्रकरणामुळे आता भाजपच्या माजी आमदार संगीत ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून केज न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. ते आदेश अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यालयाने कायम ठेवल्याने ठोंबरे यांची कोंडी झाली आहे.
सूतगिरणीची नोंद करताना बनावट प्रस्ताव संगीत आणि त्यांचे पती प्रकाश यांनी तयार केला असून सहकारी हा प्रस्ताव प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग औरंगाबाद व संचालक वस्त्रोद्योग नागपूर यांच्याकडे दाखल केला. गणपती सोनाप्पा कांबळे यांना सूतगिरणीचे संचालक दाखवत त्यांच्या नावासमोर बनावट स्वाक्षरी केली होती, असा ठोंबरे दाम्पत्यावर आरोप लावण्यात आला आहे.