अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे दारू काळ्या बाजारात विकली जात आहे. त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जात आहे. अशीच एक धक्कादाययक घटना नगरच्या सरकारी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत घडली आहे. तब्बल पावणे तीन लाख रुपयांची विदेशी दारू पोलिसांनी पकडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यात रुग्णालयातीलच एका कर्मचार्याचा समावेश आहे.
रुग्णवाहिकेतून दारूवाहतूक करताना तोफखाना पोलिसांनी जिल्हा रुग्णालय परिसरात तिघांना पकडले. वीरू प्रकाश गोहेर, रॉबिन जॉर्ज कोरेरा (दोघे, रा. सरकारी रुग्णालय कर्मचारी वसाहत ), संजय गंगाराम हंकारे (रा. रासनेनगर) अशी त्यांची नावे आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील सरकारी रुग्णालय कर्मचारी वसाहतीत पाण्याच्या टाकीजवळ दुचाकीवरून दोघे अवैध दारूवाहतूक करीत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, पाण्याच्या टाकीजवळ वीरू गोहेर, रॉबिन कोरेरा दुचाकीवर दारूवाहतूक करताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊ न चौकशी केली असता, त्यांना दारू रुग्णवाहिकेतून मिळाली असून, आणखी एक बॉक्स असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जाऊन रुग्णवाहिकेची झडती घेतली असता, विदेशी कंपनीच्या दारूचा एक बॉक्स आढळून आला. पोलिसांनी रुग्णवाहिका, दुचाकी, अवैध दारू असा सुमारे दोन लाख 70 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विशेष म्हणजे रुग्णालयाला खेटून पोलीस ठाणे असताना ही दारू विक्री केली जात होती. ही दारू कोठून आली याचा शोध पोलीस घेत असून त्याकरिता उत्पादन शुल्क विभागाची मदत घेण्यात आली आहे. दरम्यान, पांगरमल ( ता. नगर ) येथे विषारी दारूमुळे अनेकांचे बळी गेले होते. ही विषारी दारू जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कँटीनमध्ये तयार करण्यात आली होती. त्या वेळी चौकशी झाली, पण आता पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील रुग्णवाहिकेत दारू आढळून आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे.
एनपीन्यूज24 नेटवर्क