नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी गोल्ड लोन स्टार्टअप कंपनी रुपीक फिन्टेक मध्ये गुंतवणूक केली असून ही एक ऑनलाईन कंपनी आहे. जी सोन्याचे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंवर कर्ज देते.
मागील काही महिन्यात कंपनीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कंपनीने GGV कपिटलसोबत इतर काही गुंतवणूकदारांकडून ६ कोटींचा निधी जमा केला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, टँगलिन व्हेंचर पार्टनर, फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांच्या बीटीबी व्हेंचर्स आणि कोरियाच्या केबी इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून निधी उभारला जाणार आहे. तर बंगळूरमध्ये या स्टार्टअपचे मूल्यांकन ३० कोटी डॉलर्स असून रूपीकने आपल्या वतीने या मूल्यांकनाचा खुलासा केलेला नाही, अशी माहिती मिळत आहे.
एका अहवालानुसार रुपीकतर्फे कर्ज घेणाऱ्यांना घरी बसल्या कर्ज मिळत असून कंपनी घरी जाऊन एक मूल्यांकन करते आणि कर्जाचे वितरण करते. सप्टेंबर २०१९ मध्ये कंपनीने १. ६० कोटी डॉलर्सचे कर्ज वितरित केले असून कंपनी आता दरमहा २. ८० कोटी डॉलर्सचे कर्ज देते, असे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मणियार यांनी सांगितले. तसेच सोन्याचे कर्ज घेणाऱ्या नवीन ग्राहकांची संख्या वाढत आहे. आम्ही भारतीयांना संधी देत आहोत की त्यांनी आपले कौटुंबिक दागिने एखाद्या सोनाराकडे तारण न ठेवता चांगल्या पद्धतीने आमच्याकडे तारण ठेवावेत आणि पैसे मिळवावेत, असेही मणियार म्हणाले.