पुणे : बहुजननामा ऑनलाइन – चिखली येथील जाधववाडीमध्ये असलेल्या सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी पहाटे पकडले. धक्कादायक म्हणजे पकडण्यात आलेल्या पाच जणांपैकी तिघे जण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुमित ऊर्फ आक्या बाँड पांडुरंग मोहोळ (वय १९, र महालक्ष्मी सोसायटी, चिखली) आणि अक्षय संदीप चव्हाण (वय १९, रा. श्रीगणेश सोसायटी, चिखली) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचे ३ साथीदार हे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, स्टीलचा पाईप, दोन लोखंडी कटावण्या, स्क्रु डायव्हर, लोखंडी करवत, पक्कड, दोरी, मिरची पुड व कार असा ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार कुदळवाडीकडून जाधव सरकारकडे जाण्याच्या रस्त्याच्या पुलाखाली पहाटे सव्वा वाजता घडला.
याबाबत पोलीस नाईक चेतन दत्तात्रय सावंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आक्या बाँडवर यापूर्वी मारहाण, शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचे गुन्हे दाखल आहेत.
चिखली पोलिसांना काही जण दरोड्याच्या तयारीत मोटारीमध्ये पुलाखाली थांबले असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाखाली पाहिले असता त्यांना एक मोटार दिसून आली. पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेराव टाकून पकडले. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.