नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी ‘काळ्या जादू’च्या माध्यमातून तरुणीला 50 कोटींच्या ‘पैशांच्या पावसाचे’ आमिष दाखवले. त्यानंतर या तरुणीला कपडे काढण्यासही सांगण्यात आले. मात्र, या तरुणीने त्या ठिकाणाहून पळ काढला अन् घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या.
नागपूर येथे पाच जणांनी तरुणीला 50 कोटी रुपयांचे आमिष दाखवले होते. जेव्हा संबंधित तरुणी या पाच जणांकडे गेली. तेव्हा या आरोपींनी तरुणीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने सतर्कता दाखवत पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत संबंधित तरुणीने सांगितले, की काही दिवसांपूर्वी तिला एक व्यक्ती भेटली. त्याने तिला श्रीमंत बनवण्याचे स्वप्न दाखवले होते. त्यासाठी त्याने काही अटी घातल्या होत्या. जर तरुणीने या अटी पूर्ण केल्या तर ती श्रीमंत होईल. तसेच काळ्या जादूने आकाशातून 50 कोटी रुपयांचा पाऊस पाडू, असेही त्या व्यक्तीने म्हटले होते.
जेव्हा ही तरुणी आरोपीच्या जाळ्यात अडकली तेव्हा आरोपींनी तिला कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर तिला संशय आला. आरोपी सातत्याने निर्वस्त्र होण्यासाठी त्या तरुणीवर दबाव टाकत होता. मात्र, तरुणी दुर्लक्ष करत होती. पण त्यानंतर तिने घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट पोलिस ठाणे गाठले.
दरम्यान, या तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या सर्व पाच आरोपींविरोधात काळा जादू कायदा, पॉक्सोसह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.