बारामती : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आणि दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडे ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब दोडतले यांना एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती.
हा व्हिडिओ प्रसारित करून समाजात बदनामी करून राजकीय कारकीर्द खराब करण्याची धमकी या पाच जणांनी दिली होती. सचिन ज्ञानेश्वर पडळकर (वय ३० वर्षे, रा. माळशिरस, जि. सोलापूर), डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय २१, रा. शिरूर), दत्तात्रय पांडूरंग करे (वय रा. माळशिरस), विकास शिवाजी आलदार (वय ३४, रा. माढा), तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे (वय २६, रा. माळेगाव ता.माढा) अशी पाच जणांची नावे आहेत. याप्रकरणी अण्णासाहेब रुपनवर यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान ,४ मे रोजी बारामती येथील हॉटेलमध्ये फिर्यादी व आरोपी यांनी तडजोडीसाठी बैठक घेतली होती. तडजोडी करून ३० कोटी खंडणी देण्याचे ठरले. खंडणीचा १५ कोटींचा पहिला हप्ता गुरुवारी देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार पोलीसांत देण्यात आली होती. बारामती गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून आरोपींची चौकशी सुरू होती.