कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकातामधील लोकांचे पाण्याखाली प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून आज कोलकाता मेट्रो रेल कोर्पोरेशनने आपल्या पूर्व-पश्चिम प्रकल्पाअंतर्गत अंडरवॉटर मेट्रो सुरु केली आहे. आजच या अंडरवॉटर मेट्रोचे उदघाटन होणार असून कोलकातामधील ही मेट्रो हावडा ब्रिजशी जोडली आहे.
ही मेट्रो दोन टप्प्यात बांधली असून कोलकाता मेट्रोचा पूर्व-पश्चिम प्रक्लप १६ किमी लांब आहे. हा प्रकल्प सॉल्ट लेक स्टेडियम ते हावडा मैदानापर्यंत आहे. पहिला टप्पा सॉल्ट लेक सेक्टर-५ ते सॉल्ट लेक स्टेडियम दरम्यान ५.५ किमी लांबीचा आहे. याच मार्गावर करुणमयी, सेंट्रल पार्क, सिटी सेंटर आणि बंगाल केमिकल मेट्रो स्टेशन असून दुसरा टप्पा ११ किमी लांबीचा आहे.
या बोगद्याच्या बांधणीसाठी रशिया आणि थायलंडमधील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून पाण्याची गळती रोखण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. पाणी गळतीपासून बचाव करण्यासाठी, सुरक्षा पातळीचे ३ स्तर तयार केले असून या बोगद्यात ताशी ८० किमी वेगाने मेट्रो ट्रेन धावू शकेल. प्रकल्प जलद गतीने सुरू असून २००९ पासून या प्रकल्पाचे काम चालू होते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यकाळातही हे काम जलद गतीने होत होते. २०२१ पर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. वरच्या आणि खालच्या मार्गावर दोन बोगदे तयार करण्यात आले असून या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८५७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.