पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे हौसिंग मंडळाच्या वतीने ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 2 हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या इतिहासात प्रथमच पाडव्याला ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढली जात आहे. कोरोना संकटात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोना काळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. आता पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 2 हजार घरांची सोडत काढली जाणार आहे. म्हाडाच्या योजनेतील 600 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या 1300 असे एकूण 1900 सदनिकांच्या संगणकीय सोडत काढली जाणार आहे. यात दीड हजार घरे ही पुणे शहरातील नामांकित बिल्डरांकडील असून ती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे माने- पाटील यांनी सांगितले.