मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात नेत्यांचे भाजपकडे आऊटगोईंग झालेल्या काहीश्या हतबल राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांच्या यादीबद्दल गूढ अजूनही कायम असून अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे याबाबतची उत्सुकता वाढत आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी आपली उमेदवारांची यादी येत्या २ ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीला जाहीर करणार असल्याचे सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जागावाटपाचा ५०-५० असा फॉर्मुला ठरल्यानंतर काल काँग्रेसने आपली यादी जाहीर केली. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी देखील आपली उमेदवारांची यादी जाहीर करेल अशी शक्यता होती. मात्र आज राष्ट्रवादीची यादी जाहीर झाली नाही. राष्ट्रवादी आपली उमेदवारांची यादी २ ऑक्टोबरला जाहीर करणार आहे.
काट्याने काटा काढणार :
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना यादी जाहीर करण्याबद्दल विचारले असता यावेळी पक्षाच्या उमेदवारीची घोषणा २ तारखेला होणार असे सांगतानाच भाजपाला इशाराही दिला. राष्ट्रवादीचे अनेक नेते-कार्यकर्ते भाजपात गेल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आता काट्याने काटा काढायचा असून, सुरुवात त्यांनी केली असली तरी शेवटी आम्ही करणार आहोत’ असे ते सूचकपणे म्हणाले.
महायुतीची घोषणा लवकरच :
जागावाटपाबाबत महायुतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ थांबले आहे. जागावाटप पूर्ण झाले असून लवकरात लवकर म्हणजे आज रात्री बारा पर्यंत महायुतीची अधिकृत घोषणा केली जाईल असं वक्तव्य भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Visit : bahujannama.com