पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी रिलायन्स समूह पुढे आला असून त्यांनी मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केले आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र 100 खाटांची सुविधा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात पहिल्यांदाच पाउल उचलले गेले आहे. अवघ्या दोन आठवडयांत याबाबतची सुसज्जता समूहाने केली आहे. रिलायन्स फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजला हे शक्य झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रिलायन्समार्फत चालविल्या जाणार्या महाराष्ट्रातील लोधिवली येथील रुग्णालयात विलगीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर रिलायन्स लाइफ सायन्सेसमध्ये चाचणी सुविधा आहे. आव्हानावर मात करताना कराव्या लागणार्या उपाययोजनांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने अर्थसहाय देऊ केले आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्सने महाराष्टाच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रिलायन्स फाऊंडेशनमार्फत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरविले जाणार आहे. तसेच करोना रुग्णांसाठी वापरल्या जाणार्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवसाला एक लाख मास्क तयार करण्यापर्यंतची क्षमता वाढविली आहे. समूहाच्या विविध कंपन्या, विभागात कार्यरत असलेले कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचार्यांना नियमित वेतन दिले जाईल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे.