मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा समर्थकांनी तानाजी चित्रपटाचा वापर करून एक व्हिडिओ तयार केला असून यामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने राज्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. पुस्तक झालं आता व्हिडीओ आला ! अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय, अशा शब्दांत भाजपाचे राज्यसभा सदस्य संभाजीराजे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून मोठा गदारोळ उठला होता. शिवप्रेमींनी यावर तीव्र संताप व्यक्त केला होता. नंतर मुळ वाद बाजूला जाऊन राज्यातील राजकीय नेत्यांमध्येच जुंपली होती. हा वाद शमला नसतानाच पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केली गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
या संतापजनक प्रकारानंतर संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे.
पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन दिल्ली निवडणुक 2020 असे नाव देऊन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तानाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील शरद केळकरच्या चेहर्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. तर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेतील अभिनेता अजय देवगणच्या चेहर्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तर उदयभान राठोडच्या भूमिकेतील सैफ अली खानच्या जागी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. या व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये पुन्हा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Visit : bahujannama.com