पुणे : बहुजननामा ऑनलाइन – आज पहाटेच्या सुमारास कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका वृद्ध महिलेचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आकुर्डी येथे घडली आहे. मृत महिलेचे नाव भारती नंदलाल सारडा (70) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती सारडा यांचे आकुर्डीतील म्हाळसकांत चौकात सारडा क्लॉथ सेटर नावाचे कपड्यांचे दुकान आहे. श्रीमती सारडा यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या दुकानातच राहात होत्या. आज पहाटेच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली आणि या आगीत भारती सारडा यांचा मृत्यू झाला.
आगीच्या घटनेनंतर वल्लभनगर मुख्य केंद्र, प्राधिकरण उपकेंद्र, तळवडे उपकेंद्राच्या तीन आग्निशामक गाड्या घटनास्थळी आल्यानंतर आग विझवण्यात आली. मात्र, कोणत्या कारणामुळे ही आग लागली, हे अद्याप समजलेले नाही. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.