FIR On Rajendra Hagawane | धक्कादायक! अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांच्यावर हुंड्यासाठी सुनेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : FIR On Rajendra Hagawane | ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी देऊन सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीचे लग्न करुन दिले. हुंडा दिला नाही आणि कबुल केल्याप्रमाणे हुंडा दिला नाही, म्हणून विवाहितेला मारहाण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे याच्यासह पाच जणांवर बावधन पोलीस ठाण्यात (Bavdhan Police Station) दाखल करण्यात आला आहे. (Ajit Pawar NCP)

वैष्णवी शशांक हगवणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. बावधन पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे Shashank Rajendra Hagawane (वय २७), सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे Rajendra Tukaram Hagawane (वय ५७), सासु लता राजेंद्र हगवणे Lata Rajendra Hagawane (वय ५०), नंणंद करीश्मा राजेंद्र हगवणे Karishma Rajendra Hagawane (वय२४), दीर सुशील राजेंद्र हगवणे Sushil Rajendra Hagawane (वय २७) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे (वय ५१, रा. संतकृपा निवास, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात सध्या असून २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेचे शरद ढमाले यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुळशी विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढविली होती. ( Dowry Harassment Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद कस्पटे यांची मुलगी वैष्णवी आणि भुकुम येथील शशांक हगवणे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते़ राजेंद्र हगवणे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले असल्याने वैष्णवी व शशांक यांच्या लग्नाला त्यांनी संमती दिली. वैष्णवी हिच्यासाठी त्यांच्याकडून ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी देऊन सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याचे बोलीवर २८ एप्रिल २०२३ रोजी लग्न करुन दिले. त्यानंतर वैष्णवी नांदण्यास गेली. लग्नाच्या दुसर्‍या दिवसांपासून शशांक व तिचे सासुसासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या कारणात्सव वाद घालून तिच्या बरोबर भांडणे करु लागले. वैष्णवी हिने फोनद्वारे सांगितले. त्यांनी मुलीचा संसार टिकावा, म्हणून दोघांना समजावून सांगून वेळ मारुन नेत ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती राहिली. तेव्हा शशांक याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला तिला मानसिक त्रास दिला. घरातून हाकलून दिले.

हुंड्याच्या पैशांसाठी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून विषारी औषध खाऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शशांक याने जमीन खरेदी करण्यासाठी पैशांची कमतरता आहे, २ कोटी रुपये द्या अशी मागणी केली. त्याचे घरी जाऊन शशांक याने वैष्णवी हिला तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय़ मी तुला काय फुक्कट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने पैसे दिले नाही तर मी तुझ्या आख्ख्या खानदानाचा काटाच काढतो, असे बोलून धमकी दिली. त्यानंतरही तिला त्रास देणे सुरु होते. मार्च २०२५ मध्ये तिला वाकडला आणून सोडले.

गाडीमध्येही तिला सासु, नणंदेने मारहाण केली. तेव्हा वैष्णवी हिने गाडीतून उडी मारुन जीव देईन असे बोलल्यावर त्रास देणे बंद केले. १६ मे रोजी प्रणव उत्तम बहिरट याने फोन करुन शशांक हगवणे व वैष्णवीचे वाद झाले असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी शशांक याला फोन केल्यावर त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर दुपारी शशांक याने प्रणव याला फोन करुन वैष्णवीने फाशी घेतल्याचे सांगितले. ते तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती. डॉक्टरांकडे चौकशी केल्यावर तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. तिच्या दोन्ही हातावर, दोन्ही मांडीवर, पायावर, पाठीवर, डोक्यावर जखमेच्या खुणा तसेच गळ्याच्या हनुवटीवर लालसर व्रण दिसत होता. डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालावरुन तिचा मृत्यु नेमका कसा झाला, हे समजल्यानंतर त्यानुसार कलम वाढ करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.