बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असून टीका- टीप्पणीला वेग आला आहे. महाविकास आघाडी व भाजप नेते आमने- सामने आले आहेत. त्यात आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader and former MP Kirit Somaiya) यांनी उडी घेतली आहे. ईडीच्या चौकशीपासून राऊत कुटुंबीय दूर का पळत आहेत, अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
सोमय्या यांनी एक ट्विटद्वारे खा. राऊत, प्रवीण राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ED चे हे तिसरे समन्स आहे. मात्र, तरीही खा. राऊत यांचे कुटुंबीय ED समोर हजर राहत नाहीत. राऊत कुटुंबीय दूर का पळत आहेत? पीएमसी बँक, एचडीआयएल बँक, प्रवीण राऊत आणि संजय राऊत कुटुंबात झालेल्या कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत या परिवारात नेमके काय विशेष नाते आहे? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे.
‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’चा तपास व्हायला हवा
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, एचडीआयएलने पीएमसी बँकेचे 5 हजार 400 कोटी रुपये चोरले असून, एचडीआयएल आणि प्रवीण राऊत कुटुंबात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोन कुटुंबातही कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या दोन्ही परिवाराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून, हा पैसा कुठून आला? आर्थिक व्यवहाराचा ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवून 29 डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे, अशी माहिती राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.