बहुजननामा ऑनलाईन – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाबाबत नुकतीच मोठी घोषणा केली आहे. बँकांच्या विलीनीकरणाच्या घोषणेत १० बँकाचे विलीनीकरण करून ४ बँका तयार करण्यात येणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता 18 सरकारी बॅंकांवरुन १२ सरकारी बँकांची संख्या होणार आहे. या विलीनीकरणामुळे पंजाब नॅशनल बँक स्टेट बॅंक ऑफ इंडियानंतरची सर्वात मोठी बँक असेल.
त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) विलीन होतील. यासह पंजाब नॅशनल बँक दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असेल. त्याचवेळी युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या तीन बॅंकाचे विलीनीकरण होईल. ही पाचव्या क्रमांकाची बँक असेल. तर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक एकमेकांमध्ये विलीन होतील. ही सातव्या क्रमांकाची बँक होईल. याशिवाय कॅनरा बँक सिंडिकेट बँक विलीन होतील.
या आहेत त्या १२ बॅंका
विलीनीकरणानंतर देशात आता सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँका राहिल्या आहेत. २०१७पुर्वी सार्वजनिक क्षेत्रात २७ बँका होत्या. गेल्या दोन वर्षांत पीएसयू बँकांची संख्या २७ वरून १२ वर आली आहे. या १२ बँकांमध्ये पहिली (पंजाब नॅशनल बँक + युनायटेड बँक + ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स), दुसरी (कॅनरा बँक + सिंडिकेट बँक) तिसरी (इंडियन बँक + अलाहाबाद बँक), चौथी (बँक ऑफ इंडिया + आंध्र बँक + कॉर्पोरेशन बँक) असेल. तर पाचवी बँक ऑफ इंडिया, सहावी बँक ऑफ बडोदा, सातवी बँक ऑफ महाराष्ट्र, आठव्या क्रमांकावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असणार आहे. तर नवव्या स्थानावर इंडियन ओव्हरसीज बँक, दहावी पंजाब आणि सिंध बँक, अकरावी स्टेट बँक ऑफ इंडिया तर सर्वात शेवटची बारावी यूको बँक असणार आहे.